प्रस्तावना :-
पंचायत समिती दोडामार्ग कार्यालय तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. दोडामार्ग तालुका विभाजन १९९६ ते १९९९ पर्यंत झाले व दिनांक ०१/०५/१९९९ रोजी तालुका घोषित करण्यात आला व दिनांक १४/०३/२००२ रोजी पंचायत समितीची स्थापना करणेत आली. सन २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ४८९०४ आहे व तालुक्यात एकूण ३६ ग्रामपंचायती आहेत. दक्षिण आणि पश्चिमेस गोवा राज्य आहे त्यामुळे या तालुक्यातील गोवा राज्याच्या सिमेलगत विर्डी आयी माटणे आंबेगांव मणेरी सासोली फोंडये सासोली खुर्द ही गावे येतात, त्यामुळे या गावात गोवा आणि महाराष्ट्र संस्कृतीचा तसेच बोली भाषेचा संगम येथे पहायला मिळतो, आग्नेयेस कर्नाटक आणि पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा आहेत ज्यांचे एकूण क्षेत्रफळ ४५०५३ हेक्टर आहे दोडामार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका आहे. या तालुक्यात मराठी आणि कोकणी दोन्ही मोठ्या प्रमाणात बोलले जातात. तथापि, दोडामार्गची अधिकृत भाषा मराठी आहे. दोडामार्ग तालुक्याचा काही भाग घनदाट जंगलांनी व दऱ्याखोऱ्यांनी नटलेला आहे, तसेच या तालुक्यातून वाहणाऱ्या मुख्य नदीवर तिलारी धरण बांधले आहे. या तिलारी धरणावर आंतरराज्यीय विज प्रकल्प कार्यरत असून, या धरणावर रॉक गार्डन विकसीत केलेले आहे, या धरण्याचे बॅकवॉटर व जलाशयाचा आजूबाजूचा परिसर जैवविविधेतेने नटलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यटक, निसर्गप्रेमी आणि पशुपक्षी यांचे निरीक्षण करणारे यांची रेलचेल असते, फुकेरी गावातील इतिहासाची साक्ष देणारा हनुमंतगढ व त्यावरुन दिसणारे निसर्गाचे विलोभनीय दृष्ये डोळयाची पारणं फेडते, कसईनाथ टेकडी दोडामार्गची जुनी ओळख कायम ठेऊन व गिर्रीयारोहकाना जणु आव्हान देत उभी असल्यासारखी भासते, तेरवण मेढे येथील प्रसीध्द नागनाथ मंदिर आणि इतरत्र छोटी मोठी श्रद्धास्थाने दोडामार्ग तालुक्यात आहेत. दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथील धबधबा दुर्लक्षीत असला तरी पर्यटकांना साद घालत आहे, तेरवण मेढयातील उन्नैयी बंधारा व त्याच्या आजुबाजुचा परिसर प्रेक्षणीय स्थळ आहे.